जागतिक नदी दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !

नदीच्या तरंगात...मनाच्या अंतरंगात ...नदीच्या स्वच्छ पाण्यात डूबकी मारल्यावर , नदी आपल्याला कुशीत घेते , नदीच्या कुशीत पराकोटीची ऊर्जा अन् समाधान मिळतं . नदीच्या प्रवाहाकडे एकटक बघत राहण्यात ,मनशांती तर मिळतेच शिवाय मनातही थिजलेल्या अवस्थेत असलेले हिमशिखरे वितळून प्रवाहीत होण्यास सुरवात होते. नदीच्या तळाशी दिसणारे जीव- जंतु ,दगडगोटे हे सारकाही जणू ,नदीच्या कुशीत बसून ,नदीच्या प्रवाहासोबत प्रवास करीत असतात. या प्रवासात नदीच या सार्यांचा पालक व गुरुही असते. प्रवाह संथ असला तर हळूहळू वाहत जात सा सार्यांचा प्रवास सुरु असतो तर नदीला पुर आल्यावर आक्राळ- विक्राळ रुप धारण करणारा प्रवाह ,याच जीव-जंतुंना नदी किनाऱ्यावर अलगद आणून सोडत असतो अन् प्रवाह संथ झाल्यावर पुन्हा सर्व जीव-जंतू प्रवाहात जात असतात ..नर्मदेच्या खोल पाण्यात प्रत्येकवेळी डूबकी मारतांना ,मनाच्या अंतरंगातही डूबकी मारली जात असते. नदीच्या तरंगणात तरतांना , मनाच्या आतल्या भावनांना ,विचारांना प्रवाही ठेवण्याचा मुलमंत्र नदीकडूनच मिळत असतो. आपल्या जगण्याचा प्रवासही नदीच्या प्रवाहासारखाच असतो ..कधी संथ गतीने ,तर कधी नदीच्या पुराप्रमाणे ...पण नदी मात्र नेहमीच कोणताही भेदभाव न करता नैसर्गिकपणे वाहत असते ..निसर्गाविरोधात जात,तथाकथित भौतिक सुखाच्या लालसेसाठी , मानवाने चुकीचे कृत्य केल्याने नदीचे पाणी प्रदुषित होत आहे ,तरीही नदी दरवर्षी नव्याने प्रवाहीत होऊन , साचलेली सगळी घाण नदी वाहून नेत असते व स्वच्छ पाण्याने प्रवाहीत राहते .नदीकडून नैसर्गिकपणे प्रवाही राहण्याचे ज्ञान प्राप्त होत गेलं .. .मनातली घाण अन् मळभ प्रवाही जगण्यात वाहून टाकून ,स्वच्छ पाण्याप्रमाणे मनही स्वच्छ होत गेलं...मी हवं तेव्हा ,वाटेल तेव्हा नर्मदेत डूबकी मारायला जातो, नर्मदेच्या खोल प्रवाहात डूबकी मारल्यावर प्रत्येकवेळी नविन गोष्टी स्वतच्याच अंतरंगात गवसतात ..विचार अन् मन स्वच्छ ठेवत , प्रवाही जगण्यातला आनंद वृध्दिंगत होत जातोय...नर्मदेच्या तिरावरची नयनरम्य पहाट अनुभवणं म्हणजे पाण्यावरच्या परावर्तीत सुर्य ऊर्जेत न्हाऊन निघणं , नर्मदेच्या प्रवाहात डूबकी मारणं म्हणजे , स्वतःच्या अंतरंगात डूबकी मारत ..मनावरचं सार मळभ धुवून निघणं , कात टाकत नवी तरतरी येणं ,ऊत्साहाने प्रवाही जगण्याकडे वाटचाल करणं ... नदीकाठावर बसल्याशिवाय अन् प्रवाहात डूबकी मारण्याची प्रत्यक्षानुभूती घेतल्याशिवाय , ही अदृश्य ऊर्जा प्राप्त होत नाही. प्रवाही जगण्यासाठी ..नदीच्या प्रवाहाकडे जायला हवं ...मनही प्रवाही करायला हवं...-
संदिप विनायक देवरे🍀