← सर्व नोंदीशाळा भेट

सातपुड्याच्या आदिवासी गावांमधल्या शाळांना भेट

यंग फाउंडेशनचे लोक डोंगररांगांवर रेलिंगजवळ उभे राहून हसत आहेत.
यंग फाउंडेशनचे लोक डोंगररांगांवर रेलिंगजवळ उभे राहून हसत आहेत.

काही दिवसांपूर्वी सातपुडा पर्वतरांगांमधल्या काही आदिवासी गावांत जाण्याची संधी मिळाली. धुळ्याच्या यंग फौंडेशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या तिथल्या शाळांमध्ये उपयोगी सामान पोहोचवण्याचं निमित्त होतं.

    नंदुरबारमधलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण- तोरणमाळ ओलांडून पुढे सातपुड्याच्या घाट रस्त्यातून जाताना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत पसरलेली गावं आणि पाडे. अनुभवी चालकानेच गाडी चालवावी आणि एका वेळेस एकच गाडी जाऊ शकेल (कधीतरी रस्त्यात पडलेले दगड स्वतःच बाजूला करून जावं लागेल) अशा नागमोडी रस्त्यांवरून जाताना, आजूबाजूला दूरवर पसरलेल्या विस्तीर्ण पर्वतरांगा आणि नर्मदा व तिच्या उपनद्या बघत जाताना, या परिसरात काम करण्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव असलेले संदीपदादा Sandip Vinayak Deore  आम्हाला बरीच माहिती देत होते. आसपासची डोंगरांमधली गावं, नद्या, झाडं हा भूगोल, निसर्गाची समृद्धी आणि तिथे राहणारी माणसं, संस्कृती, असलेल्या/नसलेल्या सोयीसुविधा, अडचणी या सगळ्यांबद्दल बोलणं आणि अधूनमधून शांतता अनुभवत आम्ही उडद्या गावात पोहोचलो.

    पुढे २ दिवस त्या गावात राहताना आणि आसपासच्या शाळांना भेटी देताना खूप गोष्टी अनुभवता आल्या- दूरवर शेतांमध्ये विखुरलेली डोंगरावरची घरं, बांबूचा वापर करून बनवलेल्या खोलीत, सारवलेल्या जमिनीवर किंवा झाडाखाली भरणारी निसर्ग संवाद शाळा, त्यातली रांगेत बसलेली, शहरातल्या पोरांनाही लाजवेल अशी शिस्त पाळणारी चुणचुणीत लहान मुलं-मुली, सरळसोट चढावरून आपण तोल सावरत दमत जात असताना बाजूने जड सामान/हंडे घेऊन भराभर चढणाऱ्या बायका-पुरुषांकडे आश्चर्याने बघत राहणं, "मौत का कुआ" सारख्या, बाजूला दरी असलेल्या रस्त्यांवरून दोन-तीन जणांना घेऊन आत्मविश्वासाने bike हाकणारे (आणि विश्वासाने त्यांच्या मागे बसणारे) लोक (- यातलेच काही अगदी दुर्गम भागातल्या शाळेसाठी काही तासाचा प्रवास करून उडद्याहून समान घेऊन गेले), मोकळ्या हवेत खाटा टाकून आकाशाकडे बघत झोपणं, डोंगराच्या पार्श्वभूमीवर नर्मदेचं शांत पाणी आणि त्यावर वाऱ्यामुळे येणाऱ्या संथ लाटा- चित्रातल्यासारखं दृष्य, नर्मदेच्या स्वच्छ प्रदूषणरहित पाण्यात मारलेली डुबकी आणि पोहायचा प्रयत्न, चुलीवर (आणि गॅसवर) सगळ्यांनी मिळून बनवलेलं जेवण आणि बरंच काही.

     या सगळ्यासोबत लांबलेल्या उन्हाळ्यामुळे निर्माण झालेली पाणी आणि धान्याची, चाऱ्याची टंचाई, झाड्याच्या फांद्या कापून गुरांना चारा म्हणून देणारे लोक, गाढवावरून दुरून आणलं जाणारं पाणी, अनेक गावांत अजूनही असलेला विजेचा आणि पाण्याच्या स्रोतांचा, मोबाईल नेटवर्कचा अभाव (थोड्या प्रमाणात पोहोचलेले सोलर दिवे व पंप), बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी शाळा, काही नाही पोहोचलं तरी दुर्गम भागात पोहोचलेलं प्लॅस्टिक... अशा सगळ्या परिस्थितीतही आदरातिथ्य करणारे गावकरी, मोकळेपणाने बोलणारे, शाळेत मनापासून शिकवणारे fellows, आदिवासी संस्कृती, त्यांच्या परंपरांमधली स्त्री-पुरुष समानता याबद्दल मिळालेली माहिती, असं बरंच काही बघायला अनुभवायला मिळालं. शांत करणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या. तरी पाऊस चालू झाला नसल्यामुळे हिरवेगार डोंगर आणि वाहत्या नद्या, धबधबे बघायचे राहिले, ते पुन्हा केव्हातरी!

   दुर्गम भागातल्या लहान मुलांना अक्षरओळख व्हावी, शाळेबद्दल गोडी लागावी म्हणून आदिवासी भागातल्या होतकरू fellows मार्फत, यंग फौंडेशन तर्फे सामाजिक योगदानातून, निधीतून या शाळा उभारल्या आणि चालवल्या जातात. सातपुड्यातला हा अनुभव जमलं तर जरूर घ्यावा.

पाण्यावर सूर्यास्ताचे प्रतिबिंब पडलेले असून मागे डोंगर आहेत.
पाण्यावर सूर्यास्ताचे प्रतिबिंब पडलेले असून मागे डोंगर आहेत.
एक महिला पाण्यात उभी आहे आणि तिने आनंदाने दोन्ही हात वर करून पाणी उडवले आहे.
एक महिला पाण्यात उभी आहे आणि तिने आनंदाने दोन्ही हात वर करून पाणी उडवले आहे.
निसर्ग संवाद शाळेत फळ्याजवळ उभी असलेली मुलगी व समोर बसलेले लोक.
निसर्ग संवाद शाळेत फळ्याजवळ उभी असलेली मुलगी व समोर बसलेले लोक.
एका साध्या बांबूच्या शेडमध्ये मुले जमिनीवर बसली आहेत आणि एक व्यक्ती उभी आहे.
एका साध्या बांबूच्या शेडमध्ये मुले जमिनीवर बसली आहेत आणि एक व्यक्ती उभी आहे.
सतपुडा हिल्समध्ये मुले चटईवर बसून पाटीवर लिहीत आहेत.
सतपुडा हिल्समध्ये मुले चटईवर बसून पाटीवर लिहीत आहेत.
मुले उघड्या मैदानावर वर्तुळ करून बसली आहेत.
मुले उघड्या मैदानावर वर्तुळ करून बसली आहेत.
चार महिला पाण्यात उभे राहून हसत आहेत.
चार महिला पाण्यात उभे राहून हसत आहेत.
यंग फाऊंडेशनचे कार्यकर्ते सातपुडा डोंगरातील वाटेवरून चालत आहेत.
यंग फाऊंडेशनचे कार्यकर्ते सातपुडा डोंगरातील वाटेवरून चालत आहेत.
यंग फाऊंडेशनच्या सापुडा परिसरातील शाळेत मुले मातीवर बसून शिकत आहेत.
यंग फाऊंडेशनच्या सापुडा परिसरातील शाळेत मुले मातीवर बसून शिकत आहेत.

देणगी द्यास्वयंसेवक व्हा