← सर्व नोंदीसंस्कृती आणि जीवन

नर्मदेकाठची पावरा संस्कृती आणि साधेपणा

डोंगराळ प्रदेशात वसलेले छोटे घर आणि शेतजमीन.
डोंगराळ प्रदेशात वसलेले छोटे घर आणि शेतजमीन.

आमचा नेमाडे बाबा नाही का म्हणत,

साधेपणा किती उदात्त असू शकतो, हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. गोगलगाईसारखा बाहेरचा स्पर्श टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचे घर का असू नये. अंदमानी, निकोबारी,भिल्ल, गोंड, लडाखी, तिबेटी, ह्या हजारो जमाती मागासलेल्या कशावरून? जो पर्यंत हिणवणारा नसतो तोपर्यंत हिनपण नसतं. शोषण करणारे तेवढे पुढारलेले हे कोणी, कशावरून ठरवलं?

नर्मदेच्या खोऱ्यात राहणारी पावरा आदिवासी जमात ही अशीच एक प्रगल्भ सामाजिक जाणिवा असलेली जमात. युवा संवाद शिबिराच्या निमित्ताने नर्मदे काठच्या ह्या लोकांशी संवाद साधता आला. त्याचं जगणं समजून घेता आलं.

प्रवीणच्या बापाने आम्हाला नर्मदेच्या काठावर एवढ्या तीस लोकांना भात अन् माश्यांच कालवण खाऊ घातलं. त्यांना म्हणलं तुम्ही दारू घेतात काय? दादा म्हणतात, “नर्मदेच्या काठावर उभा आहे, खोट नाही सांगणार. आदिवासी आहे, सणासुदीला नक्कीच घेतो पण माझ्या मर्यादा मला माहिती आहेत."

अशी ही लोकं. नर्मदा त्यांच्यासाठी प्रमाण आहे. अगदी आईसारखी. सातपुडा बापासारखा. स्वतःला so called पुढारलेल्या समजणाऱ्या समाजाला लाजवेल अशी ह्यांची संस्कृती, अस ह्याचं जगणं. ह्यांच्या गावांमध्ये कुठलं मंदिर नाही. ह्यांच्या घरांमध्ये कुठला देव्हारा नाही. ह्यांच्या देवांचा वास असतोय झाडाखाली. घरात एक लाकडाचा ओंडका गाडलेला असतोय तो ओंडकाच ह्यांच्यासाठी देव्हारा अन् ते झाडच त्यांच्यासाठी मंदिर. अन् मग कोणी एक ह्या मंदिराचा मालक नाही. इथे कुठलीही पूजा होणार ती सामूहिक पूजा असणार अन् अख्खा गाव त्यात सामील असणार.

त्यांना विचारलेलं तुमच्या गावात कुठलं मंदिर का नाही? तर ह्याचं म्हणणं आलं, आम्हाला आमच्या श्रद्धेचं भांडवल नाही करायचं. देवाच्या नावाने पैसा नाही कमवायचा. देव, मंदिर ह्या सगळ्याच्या बाबतीत जर एवढी प्रगल्भता असेल तर बागेश्वर अन् मिश्राची ची कुठे अगरबत्ती लावता. धर्माच्या नावाने ह्यांना कोणीच येड्यात काढू शकत नाही.

निसर्गाला पुजणारे हे लोकं ह्यांचे सगळे सण-वार निसर्गाला, निसर्गाच्या नवलाईला धरून असतात. झाडांना नवीन पालवी फुटायला आली की निवती पूजा होणार. जंगलातील प्राण्यांपासून आपली, आपल्या परिवाराची राखण व्हावी म्हणून बागदेव पूजन होणार. नवीन धान्य बहरून आलं की नवाई पुजल्या जाणार. असे ह्यांचे सण अन् त्यालाच धरून त्यांचे नियम सुद्धा. म्हणजे निवती पूजा होत नाही तोवर घरातलं बारकं पोरगं पण कुठल्या नव्या पानाला, पानाच्या देठालाही शिवणार नाही. नवाई पुजल्याशिवाय नव्या धान्याचा वापर सुरू होणार नाही अस सगळं.

लग्नासाठी मुली मिळणं हल्ली अवघड झालंय म्हणतात. हरियाणात म्हणे बाहेरच्या राज्यातून मुली विकत आणल्या जातात लग्नासाठी. अन् केरळात म्हणे मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. काय तर म्हणे केरळ पुढारलेलं राज्य आहे. अहो, हरियाणा अन् केरळचे कसले किस्से सांगता. आपल्या महाराष्ट्र अन् मध्यप्रदेशच्या सीमेलगतच्या ह्या भागात नर्मदेच्या खोऱ्यातली ही आदिवासी जमात. ह्यांच्यावर न कधी लग्नासाठी बाहेरून विकत म्हणून मुली आणायची वेळ आली नाही की केरळसारखं मुलांपेक्षा मुली जास्त म्हणून पुढारलेलं घोषित करायची घाई झाली नाही. ह्यांच्या ठिकाणी असलेल्या समतेच्या अन् समानतेच्या धारणा बघून आपल्यासारख्यांचा गोंधळ उडतो कधीकधी की इथे पितृसत्ताक व्यवस्था आहे की मातृसत्ताक. अन् असलं काही असूनही ह्यांना त्याचा अभिमान नाही, किंवा त्याची जाणीवही नाही.

हे सगळ बघून मला कबीर आपसूक आठवतो,

"जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान।।"

~ संत कबीर

सातपुडा परिसरातील पाण्याच्या धारेवर सूर्यास्त.
सातपुडा परिसरातील पाण्याच्या धारेवर सूर्यास्त.
पाण्याच्या जवळ संध्याकाळच्या वेळी उभे असलेले लोक.
पाण्याच्या जवळ संध्याकाळच्या वेळी उभे असलेले लोक.
मोठ्या झाडाच्या सावलीत बसलेले लोक.
मोठ्या झाडाच्या सावलीत बसलेले लोक.
यंग फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ घरातील मातीच्या जमिनीवर एकत्र बसले आहेत.
यंग फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ घरातील मातीच्या जमिनीवर एकत्र बसले आहेत.
सतपुडा डोंगरांवरील एका घरात लोक एकत्र जेवत आहेत.
सातपुडा डोंगरांमध्ये एका घरामध्ये लोक एकत्र जेवण करत आहेत.
डोंगराळ प्रदेशात वसलेले छोटे घर आणि शेतजमीन.
डोंगराळ प्रदेशात वसलेले छोटे घर आणि शेतजमीन.

देणगी द्यास्वयंसेवक व्हा