सातपुड्यात पाणी टंचाईत गाढवाचा आधार...

सध्या सातपुड्यात भीषण पाणी टंचाई आहे. पाण्यासाठी 2-4 किमी पायपीट करावी लागते. सरकारी यंत्रणा पोहचत नाही. अशा भीषण पाणी टंचाई च्या काळात पाणी आणण्यासाठी गाढवाचा आधार महत्वाचा आहे. पाणी इतक्या लांबून आणावे लागते की, गाढवं देखील थकून जातात.नर्मदेच्या खोऱ्यात एका पाड्यात गाढवाच्या पाठीवर पाण्याचे ड्रम लादून पाणी आणले जात असताना, गाढवं थकले व जागीच कोसळले... पाण्याचे ड्रम काढून गाढवाला कसबसे उभे करत आदिवासी बांधव त्याला घरी घेऊन गेले. या भागात खुप कमी लोकांकडे गाढवं आहेत. बहुतेक लोक डोक्यावर पाणी वाहतात.

बऱ्याच मुलींची शाळा पाणी आणण्यासाठी सुटते तर मुलांची शाळा गुरे राखण्यासाठी सुटतें.आधीच पुरेशा पोषण आहाराभावी कुपोषित झालेले मुले -मुली पाणी आणण्यासाठी डोंगर दरीत जातात, हे सातपुड्यातलं चित्र अतिशय वेदनादायी आहे. जल जीवन मिशन सारख्या योजना इकडे पोहचल्या नाहीयत. सरकारी कर्मचारी व अधिकारी फिरकतही नाहीत.NGO दुर्गम भाग असल्याने काम करायला येत नाहीत, तर माध्यम प्रतिनिधी येथील धोकेदायक रस्ते बघून बातम्या व ग्राउंड रिपोर्ट करायला पोहचत नाहीत. एकूणच दुर्गम आदिवासी भागात कर्तव्य बजावण्यासाठीही कोणी येत नाही व मदतीसाठी देखील कोणी येते नाही अशी परिस्थिती आहे.

यंग फौंडेशनच्या माध्यमातून या भागात आम्ही मदतीसाठी प्रयत्न करतोय, पाणी व चारा टंचाई भीषण आहे.कागदावर असलेल्या सरकारी यंत्रणेला सक्रीय करण्यासाठीही मदत हवी आहे.ज्यांना शक्य असेल त्यांनी मदतीसाठी जरूर पुढे यावे...
- संदीप विनायक देवरे
यंग फॉउंडेशन