← सर्व नोंदीलेख आणि विचार

सातपुड्यातील अंधार आणि जगण्याचे वास्तव

मुले नावित बसून पाण्यावरून प्रवास करत आहेत.
मुले नावित बसून पाण्यावरून प्रवास करत आहेत.

जितेंद्र घाटगे एका ठिकाणी लिहितात, “ पोटावर हात असणाऱ्या लोकांनी - हातावर पोट असणाऱ्यांच्या गोष्टी सांगताना थोडी तरी लाज वाटायला हवी.” अर्थात हे त्यांना उगाचच वाटतं. नियम थोडीच आहे.

मुंबईतल्या एखाद्या AC केबिन मध्ये बसून जगाच्या गप्पा हाणणाऱ्यांनी, एका सिंगल क्लिकवर ब्लिंकीट, स्वीगी, झोमॅटोच्या अन् त्या योगाने जगण्याची चंगळ असणाऱ्यांनी काय अन् कश्यासाठी म्हणून सातपुड्यातील कुठल्यातरी पाड्यावर वीज नाही, शाळा नाही असल्या गोष्टींवर आभाळ हेपलाव. आपण तेवढे संवेदनशील आहोत काय अस वाटतं अनेकदा. अर्थात मलाही हे उगाचच वाटतं. नियम थोडीच आहे.

संदीप ज्या पद्धतीने तिथे काम करतोय, आज ना उद्या कोणीतरी शिलदार, कोणीतरी गणेश पावरा, कोणीतरी प्रवीण पावरा ह्या आदिवासी लोकांचं जगणं, ह्यांचे प्रश्न जगासमोर मांडेलच. पण आपले आपण स्वयं घोषित विश्वगुरु, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमीच्या गप्पा हाणणाऱ्यांनी ह्याच्या बद्दल पण थोड बोललंच पाहिजे की गड्या.

इथे स्वातंत्र्योत्तर पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलीत ह्या परिसरात अजून वीज नाही. कुठेतरी तोरणमाळच्या तिथे चारदोन पोल आहेत त्याला विजेच्या तारा नाही. काही घरांमध्ये असलेलं सोलर तिथल्या अनेकांसाठी privilege आहे. विश्वगुरु भारतात म्हणे मोफत आणि सक्तीच बालशिक्षण भेटतं. नर्मदेकाठी इथे लांबलांब पर्यंत शाळा नाही. शाळा बाह्य मुलांची कसली गणती नाही. इथली लोकं मतदार आहेत त्यांच्यापाशी मतदान कार्ड आहे पण जन्म दाखले नाहीत. आधार नाही. अन् कागदपत्र नाहीत म्हणाल्यावर सरकारी योजना नाहीत.

अवकाळी पाऊस आला म्हणून काळया पडलेल्या बाजरीचं, डायरीया होऊन मेलेल्या लहान लहान लेकरांच, वेळेवर प्रवासाच अन् वाहतुकीच साधन नाही म्हणून झोळीतून दवाखान्यात जाणारी पोटुशी बाई कसा अर्ध्या रस्त्यात जीव टाकते याचं, अगदी टपावर बसलेल्या प्रवाश्यांसकट दरीत कोसळलेल्या गाडीच, ट्रॅफिक हवालदार ने कोणाला किती अन् कोणाला कस लुटलं ह्याचं, ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर कोणी कसं ह्यांना वेठबिगार सारखं वागवलं, दिवसाला रोजी किती दिली अन् पोटाला भाकरी किती दिली ह्याचं, अख्खा गावच्या गाव कसा गुजरातेत गेला पोटापाण्यासाठी ह्याचं. गण्याचा भाऊ मितेश वळणावळणातून कशी गाडी चालवतो त्याचं, 200 रुपयांच्या रिचार्ज करायला म्हणून 300 रुपयांच पेट्रोल भरून कसा तोरणमाळ किंवा धडगावला जातो त्याच ही असली काय काय अन् किती किती गाऱ्हाणी सांगायची. ती पण तर सांगितलीच पाहिजे की गड्या.

कितीही सोईस्कर संवेदनशीलता धरली तरी हा पट आज न उद्या उलगडून दाखवलाच जाणार. महाराज अन् गणेशच्या घरच्या शेवग्याच्या शेंगा, मक्याच्या अन् बाजरीच्या भाकरीचं कर्ज आहे आपल्यावर. मोडकळीस पडलेल्या व्यवस्थेचे, सत्ता अन् सत्ताधाऱ्यांनी केलेल्या पापाचे डागही आहेत आपल्या जगण्यावर. हे बदलावं अन् ह्यासाठी प्रयत्न व्हावेत. बस इतकंच. आमेन.

#नर्मदेकाठच्या_गप्पा

#युवा_संवाद_शिबिर

#यंग_फाउंडेशन

Lokesh Patil - जितेंद्र घाटगे एका ठिकाणी लिहितात, “ पोटावर हात... | Facebook

सतपुडा डोंगरांमध्ये मुले आणि एक तरुण मैदानावर खेळत आहेत.
सतपुडा डोंगरांमध्ये मुले आणि एक तरुण मैदानावर खेळत आहेत.
यंग फाऊंडेशनचे लोक सातपुड्याच्या डोंगरात आणि जलाशयात सहलीचा आनंद घेत आहेत.
यंग फाऊंडेशनचे लोक सातपुड्याच्या डोंगरात आणि जलाशयात सहलीचा आनंद घेत आहेत.
सातपुडा टेकड्यांवर जनावरे चरत आहेत.
सातपुडा टेकड्यांवर जनावरे चरत आहेत.

देणगी द्यास्वयंसेवक व्हा